गोमातेला राष्ट्रीय पशूचा दर्जा द्या; नागपुरात मुस्लिम समाजाचे अनोखे आंदोलन

    09-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : गोमातेला राष्ट्रीय पशू घोषित करण्याच्या मागणीसाठी नागपुरातील संविधान चौकात मुस्लिम समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यानंतर आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाकडे सुपूर्द केले.

आंदोलनात सहभागी झालेल्या नागरिकांनी गोसंवर्धन आणि गोरक्षणाबाबत सरकारने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी केली. तसेच गोहत्येच्या मुद्द्यावरून होणारे राजकारण थांबवून गोमातेला राष्ट्रीय पशूचा दर्जा देण्यात यावा, असे मत आंदोलकांनी व्यक्त केले.

मोर्चादरम्यान "हिंदू-मुस्लिम जिंदाबाद" आणि "धर्माच्या नावावरील राजकारण बंद करा" अशा घोषणा देत सामाजिक सलोखा आणि ऐक्याचा संदेश देण्यात आला. विशेष म्हणजे, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनासोबत गायीचे वासरू भेट देण्याचाही निर्णय आयोजकांनी घेतला.

आंदोलनाचे नेतृत्व करणारे बाबू खान यांनी सांगितले की, गोमाता ही केवळ एका धर्माची श्रद्धा नसून भारतीय संस्कृती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे तिच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारने गोमातेला राष्ट्रीय पशूचा दर्जा जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली.

या आंदोलनामुळे शहरात चर्चेला उधाण आले असून सामाजिक ऐक्याचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले.