
Image Source:(Internet)
पुणे : मावळ तालुक्यातील एमआयडीसी परिसरात झालेल्या दुर्घटनेत कार्बन डायऑक्साइड (CO₂) गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव एमआयडीसीतील नवलाख उंबरे परिसरात असलेल्या शॅफ्लर इंडिया कंपनीत ही घटना घडली. सुरुवातीला येथे गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती समोर आली होती, मात्र नंतर तपासात CO₂ गॅस गळती झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या दुर्घटनेत गणेश उंबरे आणि वैभव थोरात या दोन कामगारांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर श्रीकृष्ण साहू, गौरीशंकर शर्मा आणि नरसिंह पाटील हे तीन कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली. परिसर सुरक्षित करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या असून पुढील तपास सुरू आहे.या दुर्घटनेमुळे औद्योगिक सुरक्षेच्या उपाययोजनांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.