देवेंद्र फडणवीसांच्या ‘प्रमोशन’च्या चर्चेला उधाण; शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, बच्चू कडूंची इच्छा

    09-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. आमदार बच्चू कडू यांनी देवेंद्र फडणवीस यांचे प्रमोशन व्हावे आणि एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. त्यांच्या विधानाला शिंदे गटातील काही नेत्यांनी पाठिंबा दिला असला तरी भाजपकडून सावध प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

दरम्यान, रायगड विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेल्या पाठिंब्यामुळे शिंदेसेनेत नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर रायगडमधील तब्बल ३८ पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिल्याने पक्षात खळबळ उडाली आहे. स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना डावलल्या गेल्याचा आरोप नाराज पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

दुसरीकडे, चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे पक्षातून हकालपट्टी झालेल्या शैलेश कुमार अग्रवाल यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

विजय वडेट्टीवार यांनी परवानगी दिल्यास सपकाळ यांच्याबाबत अनेक गोष्टी उघड करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.याचवेळी बारामतीतील नगरसेवक किशोर मासाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी पक्षाने ही कारवाई केली. संबंधित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर मासाळ यांनी सार्वजनिक माफी मागितली होती, मात्र पक्षाने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत हकालपट्टीचा निर्णय घेतला.

दरम्यान, राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाष्य केले आहे. कर्जमाफीसाठी घालण्यात आलेल्या अनेक अटी शेतकऱ्यांसाठी अडचणीच्या ठरत असल्याचे सांगत त्यांनी सरकारने त्यात दुरुस्ती करावी, असा सल्ला दिला. पात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळावा यासाठी अटी अधिक सुलभ करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

राज्यातील या घडामोडींमुळे महायुती आणि विरोधकांच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.