वर्धा जिल्ह्यात बनावट बियाणे-खतांविरोधात कृषी विभागाची कारवाई; ४२ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित

    09-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

वर्धा : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाने वर्धा जिल्ह्यात कृषी केंद्रांच्या तपासणीची विशेष मोहीम हाती घेतली आहे. बनावट बियाणे आणि खतांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या या मोहिमेत आतापर्यंत ५५४ कृषी केंद्रांची पाहणी करण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन आढळलेल्या ४२ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच ३५ केंद्रांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.


कृषी विभागाकडून तपासणीदरम्यान बियाण्यांचे २३० आणि खतांचे ३४ नमुने संकलित करून प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. या नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली.


वर्धा जिल्ह्यात एकूण १,२९७ कृषी केंद्रे कार्यरत असून, या महिन्याअखेर सर्व केंद्रांची तपासणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाने ठेवले आहे. जिल्हास्तरीय भरारी पथके, विभागीय अधिकारी, तहसील कृषी अधिकारी, गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक तसेच मोहीम अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही तपासणी मोहीम राबविली जात आहे.


तपासणीदरम्यान अनेक केंद्रांमध्ये नोंदवही व्यवस्थापनातील त्रुटी, दरफलकांचा अभाव तसेच बियाणे कंपन्यांशी संबंधित आवश्यक कागदपत्रांची पूर्तता नसल्याचे निदर्शनास आले. या अनियमिततेमुळे ३५ कृषी केंद्रांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा कृषी विभागाने दिला आहे.