अटल सेतूवरून २८ वर्षीय तरुणाची समुद्रात उडी; शोधमोहीम सुरूच, कारण अद्याप अस्पष्ट

    09-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : ट्रान्स-हार्बर लिंक (अटल सेतू) वरून समुद्रात उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली असून २८ वर्षीय तरुणाचा अद्याप कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. या घटनेनंतर पोलीस आणि बचाव पथकांकडून मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबविण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रहिवासी प्रतीक सुभाष रासकर (वय २८) हा ७ जूनच्या रात्री घरातून “जेवायला जातोय” असे सांगून बाहेर पडला होता. मात्र तो परत न आल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता ही घटना उघडकीस आली.

प्राथमिक माहितीनुसार, प्रतीक रासकर शेअर बाजाराशी संबंधित प्रशिक्षण व क्लासेस घेत असे. घरातून बाहेर पडल्यानंतर तो थेट नवी मुंबईकडे गेला आणि अटल सेतूवर पोहोचला. तेथे त्याने आपले वाहन थांबवून समुद्रात उडी मारल्याची माहिती समोर येत आहे.

घटनेनंतर तात्काळ पोलिस आणि आपत्कालीन बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. सोमवारी दिवसभर शोधमोहीम राबविण्यात आली, मात्र अद्याप त्याचा मृतदेह किंवा कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही.

दरम्यान, अटल सेतूवर सातत्याने घडणाऱ्या अशा घटनांमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. पुलावरील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची तसेच अशा घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

या प्रकरणामागील नेमके कारण काय आहे, याबाबत अद्याप स्पष्टता नसून पोलीस सर्व शक्य दिशांनी तपास करत आहेत.