विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचा दबदबा; १७ पैकी ८ जागा बिनविरोध, मविआला मोठा धक्का

    04-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : राज्यातील विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुकीपूर्वीच महायुतीने मोठी राजकीय आघाडी घेतली आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवशी अनेक बंडखोर व विरोधी उमेदवारांनी माघार घेतल्याने १७ पैकी तब्बल ८ जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा बिनविरोध विजय जवळपास निश्चित झाला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला (मविआ) मोठा धक्का बसला आहे.

१८ जून रोजी मतदान आणि २२ जून रोजी मतमोजणी होणार असली तरी अनेक मतदारसंघांतील निकालांचे चित्र मतदानापूर्वीच स्पष्ट होऊ लागले आहे. महायुतीने बंडखोरांची मनधरणी करण्यात यश मिळविल्याने अनेक ठिकाणी विरोधकांचे उमेदवार रिंगणातून बाहेर पडले आहेत.

वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर मतदारसंघातून भाजपचे अरुण लखाणी, पुण्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काकडे, ठाण्यातून शिवसेनेचे रवींद्र फाटक, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून अनिकेत तटकरे आणि यवतमाळमधून दुष्यंत चतुर्वेदी यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. याशिवाय इतर काही मतदारसंघांतही बिनविरोध निवडीची शक्यता निर्माण झाली आहे.

कोकण, पुणे, नाशिक, अहिल्यानगर, ठाणे, नांदेड, सांगली-सातारा, सोलापूर, जळगाव, परभणी आणि नागपूरसह अनेक ठिकाणी अपक्ष व बंडखोर उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. काही मतदारसंघांमध्ये मविआ समर्थित उमेदवारांच्या माघारीमुळे महायुतीला थेट फायदा झाल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, सोलापूर, जळगाव, नांदेड, भंडारा-गोंदिया, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली, छत्रपती संभाजीनगर-जालना आणि नागपूर पोटनिवडणुकीत अद्यापही चुरशीच्या लढती होण्याची शक्यता आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर महायुतीने अनेक जागांवर बिनविरोध विजयाची वाट मोकळी करत आपली संघटनात्मक ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे उर्वरित जागांवरील लढतींकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.