महायुतीचा विजय जवळपास निश्चित; अपक्ष माघारीच्या तयारीत, १७ जागांवर दावा

    04-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे संख्याबळ भक्कम असल्याने राज्यातील सर्व १७ जागांवर विजय मिळणार असल्याचा विश्वास महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना महायुतीतील अपक्ष उमेदवारही आपले अर्ज मागे घेतील, असे सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अपक्ष उमेदवारांशी चर्चा केली असून त्यातून सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचा दावा बावनकुळे यांनी केला. दुपारी ३ वाजेपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल आणि बंडखोरीची शक्यता जवळपास संपुष्टात येईल, असे ते म्हणाले.

नागपूर, भंडारा, अमरावतीसह राज्यातील सर्व १७ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असा दावा करत त्यांनी काँग्रेसने वास्तव परिस्थिती लक्षात घेऊन उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा विचार करावा, असे आवाहन केले. काही ठिकाणी बिनविरोध निवडणुकीची संधी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यवतमाळमधील काँग्रेस उमेदवारीबाबत बोलताना बावनकुळे यांनी, विजयाची शक्यता अत्यंत कमी असताना निवडणूक लढविण्याचा काय फायदा, असा सवाल उपस्थित केला. विदर्भातील पाचही जागांवर महायुतीचाच विजय होईल, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

राहुल गांधी यांच्यावर टीका करताना बावनकुळे म्हणाले की, देशातील गरिबी आणि आर्थिक परिस्थितीचे वास्तव त्यांना समजलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गरीब कल्याणाच्या योजनांमुळे देशाची आर्थिक स्थिती अधिक सक्षम झाल्याचा दावा त्यांनी केला.

कळमना बाजार समितीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, आशियातील महत्त्वाच्या बाजार समित्यांपैकी एक असलेल्या कळमना बाजार समितीला राष्ट्रीय स्तरावरील मान्यता मिळाली आहे. यामुळे नागपूर आणि विदर्भातील कृषी व व्यापार क्षेत्राच्या विकासाला नवी दिशा मिळेल.

विप्लव बाजोरिया प्रकरणावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे यांनी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. या प्रकरणात सरकारने कोणताही हस्तक्षेप केलेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.