
Image Source:(Internet)
मुजफ्फरपूर : बिहारच्या मुजफ्फरपूर शहरातील एका खासगी रुग्णालयात गुरुवारी पहाटे भीषण आग लागून 10 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला, तर 15 ते 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. ब्रह्मपुरा परिसरातील प्रसाद हॉस्पिटलमध्ये घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे.
माहितीनुसार, पहाटे सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात (ICU) अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने आग भडकली. काही मिनिटांतच आगीने उग्र रूप धारण केले आणि संपूर्ण मजल्यावर दाट धूर पसरला. धुरामुळे अनेक रुग्णांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
धुराच्या विळख्यात अडकले रुग्ण
आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी खिडक्या व दरवाजे फोडून ICU आणि इतर वॉर्डमध्ये अडकलेल्या रुग्णांना बाहेर काढण्यासाठी जीवाची बाजी लावली. बचाव पथकाने 20 हून अधिक रुग्णांची सुटका करून त्यांना तातडीने अन्य रुग्णालयांत उपचारासाठी हलवले.
अग्निशामक विभागाचे अधिकारी आर. एन. पांडे यांनी सांगितले की, घटनास्थळी पोहोचल्यावर संपूर्ण ICU विभाग धुराने व्यापलेला होता. त्यामुळे बचावकार्य करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
रुग्णालय प्रशासनावर निष्काळजीपणाचे आरोप
दुर्घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. आग लागल्यानंतर डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी रुग्णांना मदत करण्याऐवजी स्वतःचा जीव वाचवण्यास प्राधान्य दिल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, प्रशासनाने या घटनेची सखोल चौकशी सुरू केली असून आग लागण्यामागील नेमके कारण, तसेच रुग्णालयातील अग्निसुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींची तपासणी केली जात आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.