भर सभेत उद्धव ठाकरेंचा बंडखोर खासदारांवर हल्लाबोल; ऑडिओ क्लिप ऐकवत साधला निशाणा

    27-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

यवतमाळ : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मतदारसंघांच्या दौऱ्याला सुरुवात केली आहे. या दौऱ्याचा पहिला टप्पा यवतमाळमध्ये पार पडला. यावेळी खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरेही उपस्थित होते. जनतेशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदारांवर जोरदार टीका करत एका खासदाराची कथित ऑडिओ क्लिपही सभेत ऐकवली.

सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, बंडखोरांना उमेदवारी देणे ही माझी चूक होती आणि त्याबद्दल मी जनतेची माफी मागतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर आणि माझ्या शब्दावर विश्वास ठेवून मतदारांनी त्यांना निवडून दिले, मात्र त्यांनी जनतेच्या विश्वासाशी गद्दारी केली. त्यामुळे अशा लोकांना मतदारांनी जाब विचारला पाहिजे, असे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी कथित ऑडिओ क्लिप ऐकवत संबंधित खासदाराने पूर्वी शिवसेनेशी निष्ठा व्यक्त केली होती, असा दावा केला. "आईची शपथ घेऊन निष्ठेच्या गोष्टी करणारेच आज गद्दारी करत आहेत. शिवसेनेवर संकट येणार नाही, माझी काळजी करू नका, असे सांगणारे आज वेगळ्या मार्गावर गेले," असा टोला त्यांनी लगावला.

लोकसभा निवडणुकीचाही उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले की, महाविकास आघाडीने भाजपला मोठे आव्हान दिले होते. "मोदींच्या नावावर खासदार निवडून आल्याचा दावा करणाऱ्यांनी संसदेत आणि जनतेसाठी किती काम केले, याचे उत्तर द्यावे," असे आव्हान त्यांनी दिले.

शेतकरी, कर्जमाफी आणि जनहिताच्या निर्णयांचा उल्लेख करत त्यांनी आपल्या सरकारच्या कामगिरीचाही पुनरुच्चार केला. तसेच, निष्ठा सोडून सत्तेसाठी पक्षांतर करणाऱ्यांवर त्यांनी टीकेची झोड उठवली.

सभेच्या शेवटी त्यांनी सुरू होणाऱ्या एसआयआर प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित केले. रेशन कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट यांसारख्या कागदपत्रांबाबत सरकारची भूमिका काय आहे, असा सवाल उपस्थित करत भाजपवरही त्यांनी जोरदार निशाणा साधला.