
Image Source:(Internet)
बंगळुरूतील राम मंदिर रोड परिसरात घडलेल्या एका धक्कादायक अपघातात झाडाची सुकलेली फांदी अचानक कोसळून ५३ वर्षीय दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून सोशल मीडियावर ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
जखमी व्यक्तीची ओळख सुरेश अशी असून ते एका खासगी वित्तीय संस्थेत कर्जवसुलीचे काम करतात. बुधवारी (२५ जून) सायंकाळच्या सुमारास ग्राहकांकडून कर्जाचे हप्ते गोळा करण्यासाठी ते दुचाकीवरून जात असताना हा अपघात घडला.
अचानक कोसळलेल्या फांदीने घडला अपघात-
घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संपूर्ण प्रकार कैद झाला आहे. फुटेजमध्ये सुरेश हेल्मेटशिवाय दुचाकी चालवत असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाची मोठी सुकलेली फांदी अचानक तुटून त्यांच्या डोक्यावर पडल्याचे दिसते. जोरदार आघातामुळे त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ते रस्त्यावर कोसळले. गंभीर दुखापतीमुळे ते घटनास्थळीच बेशुद्ध पडले.
स्थानिकांनी दाखवली तत्परता-
अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने मदत करत सुरेश यांना राजाजीनगरमधील रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती अद्याप गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.
पोलिसांनी सुरू केली चौकशी-
या घटनेची नोंद राजाजीनगर पोलीस ठाण्यात एनसीआर (नॉन-कॉग्निझेबल रिपोर्ट) म्हणून करण्यात आली असून पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला आहे. दरम्यान, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन संबंधित झाडाची पाहणी केली.
वन विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह-
या अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी वन विभागाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनेक झाडांच्या सुकलेल्या व धोकादायक फांद्यांबाबत वारंवार तक्रारी करूनही वेळेत छाटणी करण्यात आली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. योग्य वेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या असत्या, तर हा गंभीर अपघात टाळता आला असता, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.