
Image Source:(Internet)
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकाच विमानातून झालेला प्रवास राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रवासातून काही नवे राजकीय संकेत मिळत आहेत का, अशा चर्चा सुरू असतानाच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, दोन्ही नेत्यांचा एकत्र विमानप्रवास हा केवळ योगायोग असून त्यामागे कोणताही राजकीय संदेश नाही. भाजपकडे सध्या मोठे संख्याबळ आहे. त्यामुळे त्यांना इतर पक्षातील नेत्यांची गरज भासण्याचे कारण नसल्याचे त्यांनी नमूद केले. अशा अफवांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचेही ते म्हणाले.
सूचनांमुळे नियमित विमानाने प्रवास-
वडेट्टीवार म्हणाले, सध्या वरिष्ठ नेत्यांना खासगी विमानाऐवजी नियमित विमानसेवेचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री नागपूरला जाणार होते, तर उद्धव ठाकरे यांचाही त्याच दिवशी दौरा असल्याने दोघे एकाच विमानात प्रवास करताना दिसले. त्यामुळे या घटनेचा राजकीय अर्थ काढणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
पक्षांतराच्या राजकारणावर टीका-
राज्यात सुरू असलेल्या पक्षफोडीच्या राजकारणावरही वडेट्टीवार यांनी निशाणा साधला. जनतेने ज्या पक्षाच्या चिन्हावर निवडून दिले, त्या पक्षाशी निष्ठा राखली पाहिजे. पक्ष बदलण्याची इच्छा असेल तर आधी लोकप्रतिनिधी पदाचा राजीनामा देऊन पुन्हा जनतेसमोर जावे, असे त्यांनी म्हटले.
विरोधी पक्षांना कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी लोकशाहीसाठी ही चिंतेची बाब असल्याचे सांगितले. तसेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत असून भविष्यात त्यांचा पक्ष पुन्हा सक्षमपणे उभा राहील, असा विश्वासही विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.