२००५ पूर्वीच्या नोटांबाबत आरबीआयचा मोठा निर्णय; १ जुलैपासून बँकांमध्ये बदलण्याची सुविधा बंद

    27-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : २००५ पूर्वी छापण्यात आलेल्या 'महात्मा गांधी' मालिकेतील जुन्या चलनी नोटांबाबत रिझर्व्ह बँकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. १ जुलै २०२६ पासून या नोटा सर्वसामान्य बँकांच्या शाखांमध्ये जमा करता किंवा बदलून घेता येणार नाहीत. ही सुविधा आता फक्त रिझर्व्ह बँकेच्या देशभरातील १९ प्रादेशिक कार्यालयांमध्येच उपलब्ध असेल.

रिझर्व्ह बँकेने ९ जून रोजी सर्व बँकांना यासंदर्भातील निर्देश जारी केले होते. त्यानुसार बँकांनीही अंतर्गत परिपत्रके काढून शाखांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. बँक ऑफ महाराष्ट्रने १२ जून रोजी जारी केलेल्या आदेशात २००५ पूर्वीच्या नोटा ग्राहकांना कोणत्याही परिस्थितीत एटीएम किंवा काउंटरवरून पुन्हा वितरित करू नयेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

१९९६ ते २००५ या कालावधीत छापण्यात आलेल्या पहिल्या 'महात्मा गांधी' मालिकेतील नोटा सुरक्षा वैशिष्ट्ये अधिक सक्षम करण्यासाठी टप्प्याटप्प्याने चलनातून काढल्या जात आहेत. शाखांमध्ये अशा नोटा आल्यास त्या वेगळ्या करून करन्सी चेस्टमध्ये जमा कराव्यात किंवा रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयात पाठवाव्यात, असे निर्देशही देण्यात आले आहेत.

मात्र, ८ नोव्हेंबर २०१६ रोजी चलनातून बाद करण्यात आलेल्या जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा वगळता इतर सर्व २००५ पूर्वीच्या नोटा अद्याप कायदेशीर चलन आहेत. त्यामुळे त्या अवैध ठरलेल्या नसून, त्यांची देवाण-घेवाण करण्याची प्रक्रिया मात्र बदलण्यात आली आहे.

या निर्णयानंतर ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर चौकशी होत असल्याने बँक कर्मचाऱ्यांना योग्य माहिती देण्याच्या आणि रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.