
Image Source:(Internet)
नागपूर : जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कडबी चौक परिसरात एका मोबाईल दुकानावर चोरट्याने मध्यरात्री धाड टाकत अवघ्या दहा मिनिटांत सुमारे १० लाख रुपयांचे ३३ स्मार्टफोन लंपास केले. दुकानाचे शटर तोडून ही चोरी करण्यात आली असून संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत.
ही घटना सदोबा अपार्टमेंटमधील 'नागपूर फोन अॅक्सेसरीजवाला' या दुकानात घडली. दुकानाचे मालक यश यांनी गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद केले होते. शुक्रवारी पहाटे साडेचारच्या सुमारास चेहऱ्यावर मास्क लावून आलेल्या एका चोरट्याने दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला.
दुकानात शिरल्यानंतर चोरट्याने सुरुवातीला रोख रकमेचा शोध घेतला. मात्र, पैसे न सापडल्याने त्याने दुकानातील ३३ नवीन आणि जुने स्मार्टफोन एका बॅगेत भरले आणि काही मिनिटांत तेथून पळ काढला.
शुक्रवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी आलेल्या मालकाच्या निदर्शनास शटर तुटलेले आल्याने त्यांनी आत जाऊन पाहणी केली. त्यावेळी लाखो रुपयांचे मोबाईल चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळताच जरीपटका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत तपास सुरू केला.
दुकान मालकाने सांगितले की, याच परिसरात अल्पावधीत घडलेली ही चौथी चोरीची घटना आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवण्याची आणि चोरट्यांना तातडीने जेरबंद करण्याची मागणी स्थानिक व्यावसायिकांनी केली आहे.
या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे.