
Image Source:(Internet)
मुंबई : राज्यातील शेतकरी कुटुंबांना लग्नसमारंभासाठी सुरक्षित आणि परवडणारी प्रवासी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. मुलगा किंवा मुलीच्या लग्नासाठी शेतकरी कुटुंबांना सवलतीच्या दरात एसटी बस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत दिली.
डहाणू येथे साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाडाच्या ट्रकला झालेल्या भीषण अपघातानंतर हा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित करण्यात आला. त्यावर उत्तर देताना सरनाईक यांनी सांगितले की, ग्रामीण भागात अनेक कुटुंबे आर्थिक अडचणींमुळे लग्नसमारंभासाठी ट्रक, डंपर किंवा इतर मालवाहू वाहनांचा वापर करतात. मात्र, अशा वाहनांमधून प्रवास करणे धोकादायक ठरत असून अनेकदा गंभीर अपघात घडतात.
ही परिस्थिती बदलण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडे नव्या बसेस उपलब्ध होताच लग्नासाठी एसटी बसची मागणी करणाऱ्या शेतकरी कुटुंबांना शक्य तितक्या सवलतीच्या दरात बस उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न राहील. गरजेनुसार ही बस संबंधित कुटुंबाच्या दारापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करण्याचाही विचार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राज्यातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी सरकारने ८,३०० नवीन एसटी बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या बसेस टप्प्याटप्प्याने सेवेत दाखल होणार असून त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील प्रवाशांना अधिक चांगली सेवा मिळेल. काही मार्गांवर एसटीची वारंवारता वाढविण्याचाही सरकारचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय, अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही परिवहन मंत्र्यांनी दिला. नियमांचे उल्लंघन करून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाईसह त्यांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया राबवली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या सहकार्याने विशेष सुरक्षा आराखडा तयार केला जात असून अपघातप्रवण ठिकाणांवर आवश्यक उपाययोजना केल्या जाणार आहेत. तसेच प्रवासी वाहतूक अधिक शिस्तबद्ध करण्यासाठी राज्य सरकार लवकरच ॲग्रीगेटर पॉलिसी जाहीर करणार असल्याचेही प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांना लग्नसमारंभासाठी सुरक्षित, सोयीस्कर आणि परवडणारा प्रवासाचा पर्याय उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.