
Image Source:(Internet)
मुंबई : मोहरम मिरवणुकीदरम्यान मोठा अनर्थ घडवून आणण्याचा संशय असलेला प्रकार भायखळा पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या प्रकरणात फय्याज प्रेमजी नावाच्या संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून तब्बल १४ हजार ९०० कॅप्सूल जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईची माहिती पोलीस उपायुक्त जयंत मीना यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती कोणतीही अधिकृत परवानगी न घेता 'पेन रिलीफ' औषध असल्याचे सांगून मोहरम मिरवणुकीत कॅप्सूल वाटत होता. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याची चौकशी केली आणि ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात जप्त करण्यात आलेल्या कॅप्सूलमध्ये झिंक फॉस्फाईडसारखा विषारी पदार्थ मिसळल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
या कॅप्सूलचे सेवन केल्यानंतर सलमान सय्यद नावाच्या व्यक्तीची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
तपासादरम्यान आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीने ३० हजार रिकाम्या कॅप्सूलची ऑर्डर दिली होती. तसेच सुमारे ५० किलो फॉस्फरस मागवल्याचेही पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले असून विविध अंगांनी चौकशी सुरू आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी बीबीए पदवीधर असून पुण्यात त्याचा पेंटचा व्यवसाय आहे. याशिवाय त्याने इराण आणि इराकचा प्रवास केल्याची माहितीही तपासात समोर आली आहे. त्याचा कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबंध आहे का, तसेच मोठ्या घातपाताचा कट होता का, याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र, तपास पूर्ण होईपर्यंत कोणताही अंतिम निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
ही संपूर्ण कारवाई सेंट्रल झोन-१ चे पोलीस उपायुक्त जयंत मीना, सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत भोसले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली भायखळा पोलिसांनी पार पाडली.