NCERT च्या नव्या पुस्तकात मोठे बदल; संविधानाची प्रस्तावना वगळली

    27-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नवी दिल्ली : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) ने इयत्ता नववीच्या सामाजिक शास्त्राच्या नव्या पाठ्यपुस्तकात अनेक महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. नव्या आवृत्तीत संविधानाची प्रस्तावना समाविष्ट करण्यात आलेली नसून, त्याऐवजी लोकशाही, निवडणूक प्रक्रिया, विशेष मतदार यादी पुनरावलोकन (SIR) आणि नागरिकांच्या सहभागावर आधारित नव्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

नव्या पुस्तकात मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया, पात्र मतदारांची पडताळणी आणि चुकीच्या नोंदी दुरुस्त करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष मतदार यादी पुनरावलोकन (SIR) मोहिमेची माहिती देण्यात आली आहे. निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रियेत अशा उपक्रमांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, हा यामागील उद्देश असल्याचे पुस्तकात नमूद करण्यात आले आहे.

संविधानाची निर्मिती, लोकशाही संस्था आणि मूलभूत अधिकारांबाबत माहिती देण्यात आली असली, तरी संविधानाची प्रस्तावना या आवृत्तीत समाविष्ट करण्यात आलेली नाही. त्याऐवजी लोकशाहीची कार्यपद्धती, नागरिकांचे कर्तव्य आणि घटनात्मक संस्थांची भूमिका यावर अधिक भर देण्यात आला आहे.

याशिवाय, भारतीय लोकशाहीच्या प्रवासातील महत्त्वाच्या घटनांवर स्वतंत्र प्रकरण देण्यात आले आहे. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देशातील राजकीय घडामोडी, लोकशाही संस्थांचे महत्त्व आणि नागरिकांच्या सहभागाची भूमिका समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या जनआंदोलनांचाही उल्लेख पुस्तकात करण्यात आला आहे.

नव्या पुस्तकात 'लोकशाही आणि तुम्ही' हा स्वतंत्र विभाग प्रथमच समाविष्ट करण्यात आला आहे. या विभागातून विद्यार्थ्यांना लोकशाहीतील जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका, अधिकार आणि कर्तव्यांची माहिती देण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच खोटी माहिती, सामाजिक विषमता, प्रादेशिकता, गरिबी आणि लैंगिक असमानता यांसारख्या आधुनिक आव्हानांवरही प्रकाश टाकण्यात आला आहे.

इतिहासाच्या प्रकरणात वैदिक काळातील महिलांच्या स्थानाचा उल्लेख करत मनुस्मृतीतील एका श्लोकाचा संदर्भ देण्यात आला आहे. ऋग्वेदातील महिला ऋषींच्या योगदानाची माहितीही पुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहे. तसेच भारतीय निवडणूक आयोगाच्या कार्याचा गौरव करत, जगातील सर्वात मोठी लोकशाही प्रक्रिया प्रभावीपणे पार पाडण्यात आयोगाची भूमिका महत्त्वाची असल्याचे पुस्तकात नमूद करण्यात आले आहे.