‘ऑपरेशन शक्ती’ अंतर्गत कारवाई; चार महिलांची सुटका, व्यवस्थापक जेरबंद
Image Source:(Internet)
नागपूर : शहरातील बजाजनगर परिसरात स्पा सेंटरच्या आड सुरू असलेल्या कथित देहव्यापाराच्या रॅकेटवर नागपूर पोलिसांच्या क्राइम ब्रँच युनिट-1 ने धडक कारवाई करत मोठा पर्दाफाश केला. या कारवाईत चार महिलांची सुटका करण्यात आली असून स्पा सेंटरचा व्यवस्थापक अमन नामदेवराव वैद्य याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील दोन प्रमुख सूत्रधार अद्याप फरार असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार प्रयाग एन्क्लेव्ह परिसरातील ‘मेफेअर लक्झरी स्पा सेंटर’मध्ये स्पाच्या सेवांच्या आड अनैतिक व्यवसाय चालवला जात असल्याचा संशय होता. माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला. व्यवहार निश्चित झाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने स्पा सेंटरवर अचानक छापा टाकत कारवाई केली.
छाप्यामध्ये स्पा सेंटरचा कारभार सांभाळणारा अमन वैद्य पोलिसांच्या हाती लागला. चौकशीत तो ग्राहक आणि महिलांमध्ये संपर्क साधून आर्थिक व्यवहारातून फायदा घेत असल्याचे समोर आले.
या मोहिमेदरम्यान मेघालय, बेंगळुरू, पुणे आणि आग्रा येथील चार महिलांची सुटका करण्यात आली. तसेच तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार सोनेगाव परिसरातील एका फ्लॅटमधून आणखी तीन महिलांना सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
प्राथमिक तपासात हे स्पा सेंटर मागील दोन महिन्यांपासून कार्यरत असल्याचे उघड झाले आहे. महिलांना विविध राज्यांतून नागपुरात आणून त्यांच्याकडून देहव्यवसाय करून घेतला जात होता. त्यांना निश्चित मानधनासोबत प्रत्येक ग्राहकामागे वेगळे कमिशन दिले जात असल्याची बाबही तपासात समोर आली आहे.
कारवाईवेळी पोलिसांनी रोख रक्कम, तीन मोबाईल फोन आणि इतर साहित्य असा सुमारे ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तपासात स्पा सेंटरचे संचालन ओडिशातील सुशीलकुमार लोहारीवाल आणि कमलकुमार गोस्वामी करत असल्याचे निष्पन्न झाले असून नागपूरमधील व्यवस्थापन अमन वैद्य पाहत होता.
या प्रकरणी बजाजनगर पोलिसांनी अनैतिक मानवी वाहतूक आणि देहव्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.