पोर्शे अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांची न्यायालयात याचिका

    22-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

पुणे : कल्याणीनगर पोर्शे अपघात प्रकरणातील मुख्य आरोपीच्या वडिलांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अपघातातील अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांचा जामीन रद्द करण्यात यावा, अशी मागणी पुणे पोलिसांनी न्यायालयाकडे केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे हा वाद निर्माण झाला असून, जामिनाच्या अटींचे उल्लंघन झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

शिवाजीनगर सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत पोलिसांनी नमूद केले आहे की, सर्वोच्च न्यायालयाकडून मिळालेल्या दिलासानंतरही विशाल अग्रवाल सार्वजनिक ठिकाणी कुटुंबासोबत आनंदोत्सव साजरा करताना दिसत आहेत. संबंधित व्हिडिओमध्ये ते पत्नी आणि मुलासह एका हॉटेलमध्ये संगीताच्या तालावर नृत्य करताना दिसत असल्याचे सांगितले जात आहे.

या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झालेल्या प्रकरणातील आरोपीच्या कुटुंबीयांकडून अशा प्रकारचे वर्तन योग्य नसल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. यानंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत पुढील कायदेशीर कारवाईचे निर्देश दिले.

अभियोजन पक्षाचा दावा आहे की, जामीन मिळाल्यानंतर अशा प्रकारे सार्वजनिकरीत्या उत्सव साजरा करणे हे न्यायालयाने घालून दिलेल्या अटींच्या विरोधात आहे. तसेच यामुळे साक्षीदारांवर अप्रत्यक्ष दबाव निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे. या संदर्भातील सर्व पुरावे न्यायालयासमोर मांडले जाणार आहेत.

दुसरीकडे, अग्रवाल कुटुंबाने पोलिसांचे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांच्या वकिलांनी जारी केलेल्या निवेदनात व्हायरल व्हिडिओचा अपघात प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचा दावा करण्यात आला आहे. हा व्हिडिओ २०२३ मधील असून गोव्यात त्यांच्या लग्नाच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात चित्रीत करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, पोलिसांनी विशाल अग्रवाल आणि त्यांची पत्नी शिवानी अग्रवाल यांचे जबाब नोंदवले असून, व्हिडिओची सत्यता तपासण्यासाठी डिजिटल पुरावेही गोळा करण्यात आले आहेत. न्यायालयाने अग्रवाल यांना याचिकेवर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले असून, या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी होण्याची शक्यता आहे.

पोर्शे अपघात प्रकरणातील या नव्या घडामोडीकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.