अनेकजण अडकल्याची भीती

Image Source:(Internet)
परभणी : जिल्ह्यातील मानवत तालुक्यात शनिवारी दुपारी एक हृदयद्रावक दुर्घटना घडली. यशवाडी येथील बांधकाम सुरू असलेल्या हनुमान मंदिराचा काही भाग अचानक कोसळल्याने मोठी जीवितहानी झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला असून अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शनिवार असल्याने मारुतीरायाच्या दर्शनासाठी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होती. दुपारी सुमारे ३ वाजताच्या सुमारास मंदिराच्या छताचा भाग अचानक कोसळला आणि परिसरात एकच गोंधळ उडाला. क्षणार्धात धूळ आणि मलब्याचे ढग पसरल्याने उपस्थित भाविकांमध्ये घबराट निर्माण झाली.
घटना घडताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले.
दरम्यान, प्रशासन, आरोग्य विभाग, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथके घटनास्थळी दाखल झाली असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
मंदिराचे बांधकाम सुरू असतानाच हा अपघात घडल्याने बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, छत कोसळण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून प्रशासनाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचावकार्य पूर्ण झाल्यानंतरच घटनेचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार आहे.