‘ऑपरेशन टायगर’मागे कोट्यवधींचा खेळ?; ५० कोटींची ऑफर, १५ कोटी अ‍ॅडव्हान्सचा राऊतांचा गौप्यस्फोट

    17-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शिवसेना (ठाकरे गट) चे सहा खासदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच, राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केलेल्या गंभीर आरोपांनी या प्रकरणाला नवे वळण दिले आहे. प्रत्येक खासदाराला तब्बल ५० कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली असून त्यातील १५ कोटी रुपये अ‍ॅडव्हान्स स्वरूपात देण्यात आल्याचा दावा राऊत यांनी केला आहे.

शिवसेनेच्या ६०व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला सुरू झालेल्या या राजकीय घडामोडींमुळे ठाकरे गटात अस्वस्थता वाढली आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे सहा खासदार दिल्लीत दाखल झाल्याची माहिती समोर आली असून ते लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र सादर करू शकतात, अशी चर्चा सुरू आहे. त्याचवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीदेखील दिल्लीवारी झाल्याने राजकीय हालचालींना अधिक वेग आला आहे.

या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी सोशल मीडियावर स्फोटक आरोप केला. “प्रत्येक खासदारासाठी ५० कोटी रुपयांचे डील ठरले असून १५ कोटी रुपये अ‍ॅडव्हान्स देण्यात आले आहेत. शिवसेना या ब्रँडमुळेच त्यांची किंमत वाढली आहे,” असा दावा त्यांनी केला. राऊत यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण पुन्हा तापले आहे.

शिंदे गटात जाणाऱ्या खासदारांमध्ये नागेश पाटील आष्टीकर, संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे आणि ओमराजे निंबाळकर यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे. सहाव्या खासदाराचे नाव अद्याप स्पष्ट झाले नसले तरी संजय दीना पाटील यांचे नाव चर्चेत आहे.

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी झालेल्या ठाकरे गटाच्या बैठकीत संबंधित अनेक खासदार अनुपस्थित राहिल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले. दुसरीकडे, शिंदे गटाचे आमदार कृपाल तुमाने यांनीही ठाकरे गटातील सात खासदार संपर्कात असल्याचा दावा केला होता.

राज्यातील ‘ऑपरेशन टायगर’ आता केवळ राजकीय चर्चेचा विषय राहिलेला नसून, त्यामागे कोट्यवधी रुपयांच्या ऑफर आणि मोठ्या राजकीय सौदेबाजीचे आरोप होत असल्याने पुढील काही तासांत या घडामोडी कोणते नवे वळण घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.