
Image Source:(Internet)
वॉशिंग्टन : अमेरिकेत एक मोठी हवाई दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. दक्षिण कॅलिफोर्नियातील एडवर्ड्स एअर फोर्स बेसवरून उड्डाण केल्यानंतर अमेरिकेच्या हवाई दलातील महत्त्वाचे मानले जाणारे B-52 बॉम्बर विमान दुर्घटनाग्रस्त झाले. या भीषण अपघातात विमानातील सर्व 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विमानाने नियमित मोहिमेसाठी उड्डाण केले होते. मात्र उड्डाणानंतर काही क्षणांतच विमानावरील नियंत्रण बिघडल्याने ते कोसळले. दुर्घटनेनंतर विमानाला भीषण आग लागली आणि परिसरात धुराचे मोठे लोट पसरले.
एडवर्ड्स एअर फोर्स बेस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी सकाळी सुमारे 11.20 वाजता घडली. विमानात लष्करी कर्मचारी, सरकारी अधिकारी तसेच कंत्राटी कर्मचारी प्रवास करत होते. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की कोणालाही जीव वाचवण्याची संधी मिळाली नाही.
घटनेनंतर तातडीने बचाव आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली. मात्र विमान पूर्णपणे जळाल्याने मृतांचा शोध आणि पुरावे गोळा करण्याचे काम अत्यंत कठीण ठरत आहे.
हवाई तळाचे वरिष्ठ अधिकारी कर्नल जेम्स हेस यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करताना सांगितले की, देशाने आज आठ समर्पित नागरिक गमावले आहेत. त्यांच्या योगदानाची कायम आठवण राहील.
दरम्यान, या दुर्घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक अंदाजानुसार तांत्रिक बिघाडामुळे अपघात घडला असावा. मात्र अधिकृत निष्कर्षासाठी सखोल चौकशी सुरू करण्यात आली असून तपास पूर्ण होण्यासाठी अनेक महिने लागू शकतात.
सूत्रांच्या माहितीनुसार, हे विमान हवाई दलाच्या रडार आधुनिकीकरणाशी संबंधित मोहिमेत सहभागी होते. अपघाताचे कारण शोधण्यासाठी विशेष तज्ज्ञ समिती नियुक्त करण्यात आली आहे. तपास अहवालानंतरच या दुर्घटनेमागील वास्तविक कारण समोर येणार आहे.