मातोश्रीवरील बैठकीत पाच खासदारांची अनुपस्थिती; उद्धव ठाकरेंनी मागितला स्पष्ट खुलासा

    16-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, मातोश्रीवर आयोजित खासदारांच्या बैठकीला अनेक खासदार गैरहजर राहिल्याने चर्चांना उधाण आले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या या बैठकीत ९ पैकी केवळ ४ खासदार उपस्थित राहिल्याची माहिती समोर आली आहे.

पाच खासदारांच्या गैरहजेरीमुळे पक्षांतर्गत नाराजी किंवा अन्य राजकीय हालचाली सुरू असल्याच्या चर्चांना बळ मिळाले आहे. त्यामुळे पक्षातील वातावरणाबाबत विविध तर्क-वितर्क व्यक्त केले जात आहेत.

बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या खासदारांमध्ये ओमप्रकाश राजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख आणि संजय जाधव यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी संबंधित खासदारांना आपली भूमिका सार्वजनिकपणे स्पष्ट करण्यास सांगितल्याची माहिती आहे. पक्षासोबत ठामपणे असल्याचे व्हिडिओ संदेश किंवा अधिकृत निवेदनाद्वारे जाहीर करावे, अशा सूचना देण्यात आल्याचे वृत्त आहे.

तसेच, अफवा आणि संभ्रमाला पूर्णविराम देण्यासाठी सर्व अनुपस्थित खासदारांनी पुढील दोन ते तीन दिवसांत मातोश्रीवर प्रत्यक्ष भेट देऊन आपली भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देशही देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दरम्यान, या घडामोडींमुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील अंतर्गत समीकरणांबाबत उत्सुकता वाढली असून, आगामी काळात पक्षातील राजकीय परिस्थिती कोणते वळण घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.