दुखापतीनंतर नीरज चोप्राचे पुनरागमन; दोहा डायमंड लीगमध्ये पुन्हा उडणार भाला

    16-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नवी दिल्ली : भारतीय ॲथलेटिक्सचा सुवर्णपुत्र नीरज चोप्रा पुन्हा एकदा स्पर्धात्मक मैदानात परतण्यास सज्ज झाला आहे. दुखापतीमुळे दीर्घकाळ मैदानापासून दूर राहिलेल्या नीरजचा १९ जून रोजी होणाऱ्या दोहा डायमंड लीग स्पर्धेत पुनरागमन होणार आहे. जवळपास नऊ महिन्यांच्या विश्रांतीनंतर तो पुन्हा भालाफेकीच्या रिंगणात उतरल्याने क्रीडाप्रेमींमध्ये उत्सुकता वाढली आहे.

दोन वेळा ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या नीरजने अखेर स्पर्धा २०२५ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत खेळली होती. त्यानंतर दुखापतीमुळे त्याला विश्रांती घ्यावी लागली. आता पूर्ण तंदुरुस्त झाल्यानंतर त्याने पुनरागमनाची तयारी पूर्ण केली आहे.

सध्या स्वित्झर्लंडमध्ये सुरू असलेल्या विशेष प्रशिक्षण शिबिरात नीरज आपल्या प्रशिक्षक आणि फिजिओच्या देखरेखीखाली सराव करत आहे. आगामी मोठ्या स्पर्धांचा विचार करून त्याने गेल्या काही आठवड्यांपासून फिटनेस आणि तांत्रिक कौशल्यावर विशेष भर दिला आहे.

दोहा डायमंड लीगमध्ये यंदाही जगातील अनेक अव्वल भालाफेकपटू सहभागी होणार आहेत. त्यामुळे नीरजसमोर कडवे आव्हान असणार असले तरी त्याच्या अनुभवामुळे आणि मोठ्या स्पर्धांमधील कामगिरीमुळे भारतीय चाहत्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

दरम्यान, आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठीही नीरजची निवड झाली आहे. ग्लासगो येथे होणाऱ्या या स्पर्धेत भारतीय भालाफेक संघाकडून दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. रोहित यादव आणि यशवीर सिंग यांच्यासोबत नीरजही मैदानात उतरल्यास भारताचे पदकांचे दावे अधिक मजबूत होणार आहेत.

दोहा डायमंड लीगमधील नीरजच्या पुनरागमनाकडे आता संपूर्ण क्रीडाविश्वाचे लक्ष लागले असून, त्याचा पहिला थ्रो किती दूर जातो याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.