नागपुरात महागाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचा थाळीनाद; दरवाढ कमी न झाल्यास 'चक्का जाम'चा इशारा

    16-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) आक्रमक झाला असून, पक्षाच्या वतीने संविधान चौकात 'थाळी बजाओ' आंदोलन करण्यात आले. थाळ्या वाजवत आणि गॅस सिलिंडरचे प्रतीकात्मक प्रदर्शन करत कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केला.


महिला शहराध्यक्षा प्रिया फुके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात महागाईमुळे सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक गणित बिघडल्याचा आरोप करण्यात आला. वाढत्या इंधन दरांचा परिणाम अन्नधान्य आणि इतर आवश्यक वस्तूंच्या किमतींवर होत असल्याने नागरिकांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.


माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि शहराध्यक्ष दुनेश्वर पैठे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर टीका करत घोषणाबाजी करण्यात आली.


संविधान चौकात झालेल्या या निदर्शनादरम्यान कार्यकर्त्यांनी हातात फलक, बॅनर आणि गॅस सिलिंडर घेऊन महागाईच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. इंधन दर आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती तातडीने कमी कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.


शहराध्यक्ष दुनेश्वर पैठे यांनी सरकारला इशारा देताना सांगितले की, महागाई आटोक्यात आणण्यासाठी ठोस निर्णय घेण्यात आले नाहीत, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नागपुरात तीव्र स्वरूपाचे 'चक्का जाम' आंदोलन उभारले जाईल.


या आंदोलनात शैलेंद्र तिवारी, महेंद्र भणगे, एस. बी. अहमद, वर्षा शामकुळे, देवेंद्र घरडे, मोरेश्वर जाधव, विजय येंडे, नंदकिशोर मते, शरद साहू, गोपाल ठाकूर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.