नागपुरात फळ दुकानातील जुन्या वादाची रक्तरंजित अखेर; दुहेरी हत्येप्रकरणी तीन आरोपी जेरबंद

    11-Jun-2026
Total Views |

नागपूर :
सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रघुजीनगर परिसरात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाचा नागपूर पोलिसांनी वेगाने तपास करत तीन मुख्य आरोपींना अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट-०५ आणि सक्करदरा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत आरोपींना विहीरगाव येथील गारगोटी नाला परिसरातून ताब्यात घेण्यात आले.

मंगळवारी रात्री छोटा ताजबागजवळील गोंड बस्ती परिसरात दोन तरुणांची निर्घृण हत्या झाल्याने शहरात खळबळ उडाली होती. या घटनेत आदित्य उर्फ सोनू बोडवे आणि दादू उर्फ आदित्य राहुलकर यांचा मृत्यू झाला. दोघांवरही विटा, दगड आणि धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

प्राथमिक चौकशीत धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. मृतक आणि आरोपी हे सर्वजण एका फळ दुकानात काम करत होते. काही दिवसांपूर्वी दुकानातील सुरक्षा रक्षकासोबत झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर मृतकांना कामावरून काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर दोघेही वारंवार दुकानात जाऊन वाद घालत असल्याने कर्मचारी आणि त्यांच्यात तणाव निर्माण झाला होता.

घटनेच्या दिवशीही याच कारणावरून दोन्ही बाजूंमध्ये जोरदार बाचाबाची झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की त्याचे रूप थेट हाणामारीत झाले. संतप्त झालेल्या आरोपींनी दोन्ही तरुणांवर जीवघेणा हल्ला चढवला. गंभीर जखमी झालेल्या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेनंतर आरोपी पसार झाले होते. मात्र, तांत्रिक तपास, गुप्त माहिती आणि स्थानिक सूत्रांच्या मदतीने पोलिसांनी आरोपींचा माग काढत वैभव उर्फ दादू प्रदीप डोंगरे, वेदांत उर्फ डब्बा अजय डबीर आणि अभिषेक उर्फ तात्या उत्तम राऊत यांना अटक केली.

दरम्यान, या प्रकरणात फळ दुकान मालकासह इतर काही संशयितांच्या भूमिकेचीही चौकशी सुरू असून, आणखी काही आरोपींचा सहभाग आहे का याचाही तपास केला जात आहे. मृतक आणि आरोपी या दोघांचाही गुन्हेगारी इतिहास असल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली आहे.

या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके कार्यरत आहेत. तपास पूर्ण होईपर्यंत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.