लाडक्या बहिणींना दिलासा; मे महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता लवकरच खात्यात

    11-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मे महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता लवकरच बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. यापूर्वी सरकारकडून मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. काही महिलांना दोन महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये मिळाले, तर काहींना फक्त एका महिन्याचा लाभ मिळाल्याची स्थिती होती.

दरम्यान, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न करणे तसेच पात्रतेच्या निकषात न बसणे यामुळे राज्यभरातील सुमारे 80 लाख महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आल्याचे समोर आले आहे. यामुळे अनेक ठिकाणी नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

मे महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार याबाबत अनेक दिवसांपासून उत्सुकता होती. आता समोर आलेल्या माहितीनुसार, 12 ते 15 जून दरम्यान मे महिन्याचे 1500 रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

ही माहिती भाजप आमदार मोनिका राजळे यांनी सोशल मीडियावर दिल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, ई-केवायसी प्रक्रियेमुळे मोठ्या प्रमाणात महिलांची नावे वगळण्यात आल्यानंतर विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. यानंतर राज्य सरकारकडून पुन्हा एकदा ई-केवायसीची संधी देण्याबाबत विचार सुरू असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचित केले आहे.

त्यामुळे पुढील काही दिवसांत या योजनेबाबत आणखी निर्णय होण्याची शक्यता आहे.