
Image Source:(Internet)
नागपूर : देशातील शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी, राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमधील कथित गैरप्रकार आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके १६ जून रोजी नागपुरात आंदोलन करणार आहेत. आंदोलनासाठी आवश्यक परवानग्या मिळविण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिस प्रशासनाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दिल्लीतील आंदोलनानंतर पुण्यातही आक्रमक भूमिका घेतलेल्या कॉक्रोच जनता पार्टीने आता उपराजधानी नागपुरात आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवर आवाज उठविण्याचा पक्षाचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे.
मात्र, नियोजित आंदोलनाला अद्याप पोलिस प्रशासनाची अधिकृत परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे आंदोलनाच्या आयोजनाबाबत सध्या अनिश्चितता कायम आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन प्रशासनाकडून आंदोलनाच्या प्रस्तावाची छाननी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
१६ जून रोजी आंदोलन करण्याचे नियोजन निश्चित असले तरी अंतिम मंजुरीनंतरच आंदोलनाची रूपरेषा, वेळ आणि ठिकाण जाहीर करण्यात येणार आहे. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम सुरू असून प्रशासनाच्या निर्णयानंतर पुढील घोषणा केली जाईल, असे पक्षाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, अभिजीत दिपके यांच्या नागपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणाही सतर्क झाली असून आंदोलनाला परवानगी मिळते की नाही, याकडे राजकीय व शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.