विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी तुरुंगवासाचीही तयारी;नीट वादावर अभिजीत दिपके आक्रमक

    11-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

पुणे : नीट परीक्षेतील कथित पेपरफुटणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए)च्या कार्यपद्धतीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला आणखी व्यापक स्वरूप देण्याचा निर्धार कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी)चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी लढताना कोणत्याही परिणामांना सामोरे जाण्याची तयारी असून गरज पडल्यास तुरुंगात जाण्यासही आपण तयार आहोत, असे त्यांनी सांगितले.

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिपके यांनी गुरुवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आंदोलन होणार असल्याची माहिती दिली. या आंदोलनानंतर देशातील विविध शहरांमध्येही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नीट परीक्षेतील अनियमितता आणि एनटीएच्या कारभारामुळे लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याचा आरोप करत त्यांनी केंद्र सरकारकडे उत्तरदायित्वाची मागणी केली. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

विद्यार्थ्यांनी अन्यायाविरोधात निर्भयपणे आवाज उठवावा, असे आवाहन करत दिपके म्हणाले की, लोकशाहीत युवकांचा आवाज दाबून प्रश्न सुटत नाहीत. देशभरातील विद्यार्थ्यांच्या भावना आणि अपेक्षांचा आदर होणे आवश्यक आहे.

दिल्लीत झालेल्या आंदोलनात कोणतेही औपचारिक आवाहन नसतानाही मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आणि नागरिक सहभागी झाल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सर्वच राजकीय पक्षांनी पुढाकार घेतला तर अशा स्वतंत्र आंदोलनांची गरज भासणार नाही, असेही त्यांनी सांगितले. आंदोलनाला कोणत्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा मिळाल्यास त्याचे स्वागत केले जाईल, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.