
Image Source:(Internet)
पुणे : गर्भलिंग निदानावर कायद्याने बंदी असतानाही आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून हा काळाबाजार सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव पुण्यात उघड झाले आहे. चिनी मोबाईल ॲपच्या सहाय्याने गर्भातील बाळाचे लिंग निश्चित करून त्यानंतर बेकायदा गर्भपात केले जात असल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी शिरूरमधील एका संशयित दलालाला अटक केली. त्याच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या चिनी ॲपमुळे संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश झाला. या ॲपच्या माध्यमातून गुप्तपणे गर्भलिंग निदान केले जात असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली.
तपासात अण्णा गिरी नावाच्या व्यक्तीचे नाव मुख्य सूत्रधार म्हणून समोर आले आहे. तो दौंड तालुक्यातील केडगाव येथील रहिवासी असून कोंढव्यातील एका खासगी रुग्णालयात कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात दोन डॉक्टरांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या पथकाने विविध सोनोग्राफी केंद्रांची तपासणी केल्यानंतर बार्शी, करमाळा आणि आळंदी परिसरातील अनेक महिलांनी या टोळीमार्फत बेकायदा गर्भपात केल्याचे उघड झाले.
दरम्यान, या रॅकेटचे राज्यभरातील कनेक्शन शोधण्याचे काम सुरू असून आणखी काही संशयितांची नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रातील बेकायदा व्यवहारांबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.