
नागपूर : अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या दुखापतीमुळे संपूर्ण तीन सामन्यांच्या मालिकेला मुकणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरू येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) मध्ये सुरू असलेल्या फिटनेस चाचण्यांदरम्यान हार्दिकच्या मांडीच्या स्नायूला (क्वाड्रिसेप्स) ताण आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्याला तातडीने विश्रांती आणि पुनर्वसनाचा सल्ला देण्यात आला आहे.
हार्दिक नुकताच आयपीएलदरम्यान झालेल्या पाठीच्या दुखापतीतून सावरत होता. त्यानंतर त्याने पुनरागमनासाठी तयारी सुरू केली होती. सुरुवातीला त्याला खेळण्यासाठी फिटनेस मंजुरी मिळाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, पुढील तपासणीदरम्यान झालेल्या नव्या दुखापतीमुळे त्याचे पुनरागमन पुन्हा लांबले आहे.
वृत्तांनुसार, फिटनेस चाचणीचा भाग म्हणून हार्दिकने पूर्ण 10 षटके गोलंदाजी केली. याच सत्रादरम्यान त्याच्या क्वाड्रिसेप्स स्नायूवर ताण आल्याचे समोर आले. वैद्यकीय पथकाच्या प्राथमिक मूल्यांकनानुसार, त्याला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी किमान तीन आठवड्यांचा कालावधी लागू शकतो.
यामुळे 14 जूनपासून सुरू होणाऱ्या भारत-अफगाणिस्तान वनडे मालिकेत त्याचा सहभाग जवळपास अशक्य मानला जात आहे. हार्दिकच्या अनुपस्थितीमुळे भारतीय संघाच्या संतुलनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका 14 जून रोजी धरमशाला येथे सुरू होणार आहे. दुसरा सामना 17 जून रोजी लखनौमध्ये, तर तिसरा आणि अंतिम सामना 20 जून रोजी चेन्नई येथे खेळवला जाणार आहे.
हार्दिकच्या दुखापतीमुळे भारतीय संघ व्यवस्थापनासमोर आता त्याच्या जागी योग्य पर्याय निवडण्याचे आव्हान उभे राहिले आहे.