पुणे विषारी दारूकांडात नवा ट्विस्ट; मुख्य आरोपीशी संपर्काच्या संशयावरून चार पोलीस कर्मचारी निलंबित

    01-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसराला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारूकांडाच्या तपासात आता धक्कादायक बाबी समोर येऊ लागल्या आहेत. या प्रकरणात आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला असून अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. दरम्यान, मुख्य आरोपीशी कथित संबंध असल्याच्या संशयावरून पुणे ग्रामीण पोलीस दलातील चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

विषारी दारू प्रकरणातील प्रमुख आरोपी राधेश्याम प्रजापती याच्याशी काही पोलीस कर्मचाऱ्यांचे संपर्क असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर पाऊल उचलत त्यांना तत्काळ निलंबित केले.

निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये दौंड उपविभागीय पोलीस कार्यालयातील सुभाष डोईफोडे, उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार अजित काळे, पोलीस शिपाई सुमित वाघ आणि यवत पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार रामदास जगताप यांचा समावेश आहे.

अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग यांच्या चौकशी अहवालात संबंधित कर्मचाऱ्यांचे वर्तन संशयास्पद असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या कृतीमुळे पोलीस दलाच्या प्रतिमेला धक्का पोहोचल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

चौकशी प्रक्रियेवर परिणाम होऊ नये म्हणून निलंबित कर्मचाऱ्यांचे मुख्यालय पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात निश्चित करण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडण्यास त्यांना मनाई करण्यात आली असून दिवसातून दोन वेळा हजेरी लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

विषारी दारूकांडाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे नवीन धागेदोरे समोर येत आहेत. अवैध दारू व्यवसायाला संरक्षण देणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला किंवा यंत्रणेला पाठीशी घातले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी काही महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.