नागपूरात ‘ऑपरेशन थंडर’ची कारवाई; 7.5 किलो एमडी पावडरसह एकाला अटक

    01-Jun-2026
Total Views |
2.37 कोटींचा मुद्देमाल जप्त

Image Source:(Internet)

नागपूर : शहरातील अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन थंडर – एकत्र येऊया, नशामुक्त समाज घडवूया’ या विशेष मोहिमेअंतर्गत जरीपटका पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 7 किलो 567 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) पावडर जप्त केली आहे. या अंमली पदार्थाची बाजारातील अंदाजित किंमत 2 कोटी 37 लाख 87 हजार 290 रुपये असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेत अंमली पदार्थांची विक्री, साठवणूक आणि सेवन करणाऱ्यांविरोधात सातत्याने कठोर कारवाई करण्यात येत आहे. त्याच मोहिमेचा भाग म्हणून 31 मे रोजी जरीपटका पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उप्पलवाडी येथील एसडीपीएल आश्रय बिल्डिंगमधील फ्लॅट क्रमांक 103 वर छापा टाकण्यात आला.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी फ्लॅटमध्ये उपस्थित असलेल्या मझहर अली अकबर अली (वय 30, रा. आझाद नगर, टेका नाका, पाचपावली, नागपूर) याची चौकशी केली. त्यानंतर पंचांसमक्ष फ्लॅटची झडती घेतली असता बाथरूममध्ये प्लास्टिकच्या पोत्याखाली लपवून ठेवलेल्या 14 झिपलॉक पिशव्यांमध्ये मोठ्या प्रमाणात एमडी पावडर आढळून आली.
जप्त करण्यात आलेल्या एमडी पावडरचे वजन 7 किलो 567 ग्रॅम इतके असून आरोपीकडून दोन मोबाईल फोन, सोनेट कार (एमएच-24 बीएल-9950), इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, बँक पासबुक तसेच इतर साहित्य असा एकूण 2.37 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

प्राथमिक चौकशीत आरोपीने ही एमडी पावडर उत्तर प्रदेशातून आलेल्या एका व्यक्तीकडून मिळाल्याची कबुली दिली आहे. हा साठा विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी यापूर्वीही ड्रग्ज तस्करीच्या साखळीत सक्रिय होता का आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा सखोल तपास पोलीस करीत आहेत.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम 8(क), 22(ब) आणि 29 अन्वये कपिलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त विनिता साहू, पोलीस उपायुक्त डॉ. संदीप पखाले आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सत्यवीर बंडीवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल ताकसांडे व त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.