
Image Source:(Internet)
बीड : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणातील प्रमुख आरोपी मानल्या जाणाऱ्या पी. व्ही. कुलकर्णी याला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. सीबीआयच्या कारवाईनंतर आता बीडमधील त्याच्या अनधिकृत मालमत्तेवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला असून शाहूनगर परिसरातील चार मजली इमारतीचा बेकायदा भाग पाडण्यास सुरुवात झाली आहे.
नीट परीक्षेतील गैरव्यवहाराच्या तपासादरम्यान पी. व्ही. कुलकर्णी याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर स्थानिक प्रशासनाने त्याच्या मालमत्तांची तपासणी केली असता संबंधित इमारतीचे बांधकाम नियमांचे उल्लंघन करून करण्यात आल्याचे उघड झाले. याप्रकरणी प्रशासनाने संबंधित बांधकाम व्यावसायिकाला नोटीस बजावून बांधकाम हटविण्याचे आदेश दिले होते.
नोटिशीची मुदत संपल्यानंतर कारवाई अटळ ठरल्याने संबंधित ठेकेदारानेच इमारतीचा अनधिकृत भाग हटविण्याचे काम सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या कारवाईची बीड शहरात मोठी चर्चा सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणात लातूरमधील आरसीसी क्लासेसशी संबंधित प्राध्यापक शिवराज मोटेगावकर आणि पी. व्ही. कुलकर्णी यांना न्यायालयाने १० जूनपर्यंत कोठडी सुनावली आहे. तपास यंत्रणांच्या चौकशीत ‘प्लॅटिनम गोल्ड बॅच’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
सीबीआयसह अन्य तपास यंत्रणा आरोपींचे आर्थिक व्यवहार, संपर्क आणि पेपरफुटी रॅकेटमधील इतर संभाव्य सूत्रधारांचा शोध घेत आहेत. या कारवाईमुळे नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपींविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.