सुवेंदू अधिकारी लाच घेताना पकडले गेले होते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा

    09-May-2026
Total Views |
‘नारदा स्टिंग’ व्हिडीओ शेअर करत भाजपवर टीका
Image Source:(Internet)

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या ऐतिहासिक विजयानंतर आणि सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे. कोलकाता येथे झालेल्या भव्य शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह तसेच एनडीएतील अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. या प्रसंगी सुवेंदू अधिकारी यांच्यासह काही आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

दरम्यान, या शपथविधीपूर्वीच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. राऊत यांनी ‘नारदा स्टिंग ऑपरेशन’ संदर्भातील व्हिडीओ शेअर करत भाजपवर तीव्र टीका केली असून गंभीर आरोप केले आहेत.

राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, २०१४ मध्ये तहलका मॅगझिनचे पत्रकार मॅथ्यू सॅम्युअल यांनी केलेल्या नारदा स्टिंग ऑपरेशनमध्ये काही नेते लाच घेताना दिसल्याचा दावा आहे. त्यामध्ये तत्कालीन तृणमूल काँग्रेसचे नेते आणि सध्याचे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचाही समावेश असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.

त्यांच्या मते, २०१६ च्या निवडणुकीदरम्यान भाजपाने हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर प्रसारित केला होता. मात्र नंतर सुवेंदू अधिकारी पक्षात सामील झाल्यानंतर तोच व्हिडीओ अधिकृत चॅनेलवरून हटवण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

“आता याच नेत्याचे भाजपकडून कौतुक केले जात आहे. ही कोणती नैतिकता आणि कोणता सिद्धांत?” असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

सुवेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालमधील नंदीग्रामचे आमदार असून, पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यात त्यांचा मोठा राजकीय प्रभाव मानला जातो. एकेकाळी तृणमूल काँग्रेसचा मजबूत आधार असलेल्या या भागात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. नंतर २०२१ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

या संपूर्ण घडामोडीनंतर पश्चिम बंगालच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली असून, हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.