
Image Source:(Internet)
नागपूर : शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) गुरुवारी सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. अमरावती जिल्ह्यातील नांदगावपेठ येथील ३५ वर्षीय ट्रान्सजेंडर राधिका मोहन जाधव हिचा संशयास्पद मृत्यू झाल्याने रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मेडिकलच्या वॉर्ड क्रमांक १७ मध्ये उपचार घेत असलेल्या राधिकाचा मृतदेह बेडला बांधलेल्या पट्टीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी राधिका चालत्या रेल्वेतून खाली पडली होती. या भीषण अपघातात तिने दोन्ही पाय गमावले होते. सुरुवातीला तिच्यावर अमरावतीच्या इर्विन रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र प्रकृती अधिक गंभीर झाल्याने २३ एप्रिल रोजी तिला पुढील उपचारासाठी नागपूर मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले होते.
गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास वॉर्डमधील कर्मचाऱ्यांना राधिका संशयास्पद अवस्थेत आढळून आली. तिला लटकलेल्या अवस्थेत पाहताच रुग्णालय प्रशासनाला तत्काळ माहिती देण्यात आली. या घटनेनंतर वॉर्डमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
राधिकाची देखभाल रोहित बॉम्बाटे नावाचा युवक करत होता. तो उपचारादरम्यान तिच्यासोबत रुग्णालयातच राहत होता. घटनेची माहिती मिळताच अजनी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठविला.
दरम्यान, हा मृत्यू आत्महत्या आहे की घातपात, याबाबत अजनी पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. पोलीस निरीक्षक नितीन चंद्रराजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील चौकशी सुरू आहे.