
Image Source:(Internet)
तामिळनाडूच्या राजकारणात दमदार यश मिळवत चर्चेत आलेले अभिनेता-राजकारणी थलपती विजय सध्या एका वैयक्तिक दुःखामुळे भावूक झाले आहेत. विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाने ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण असतानाच त्यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीच्या निधनाची बातमी समोर आली.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ निर्माता आर.बी. चौधरी यांचे राजस्थानमधील उदयपूर येथे झालेल्या भीषण रस्ते अपघातात निधन झाले. ५ मे रोजी घडलेल्या या घटनेनंतर चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. ही माहिती मिळताच थलपती विजय यांनी तातडीने जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
अंत्यदर्शनावेळी विजय यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी अभिनेता जीवा याची भेट घेत त्याला धीर दिला. दोघे एकमेकांना मिठी मारून रडतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विजय आणि चौधरी कुटुंबीयांमधील जवळचे संबंध पाहता या निधनाचा त्यांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम पक्षाने तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत उल्लेखनीय यश मिळवत राज्याच्या राजकारणात मोठी ताकद निर्माण केली आहे. निकालानंतर विजय मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जात असून त्यांच्या राजकीय प्रवासाची देशभर चर्चा सुरू आहे. मात्र, या आनंदाच्या काळात जवळच्या व्यक्तीला गमावल्याने विजय यांच्यावर शोककळा पसरली आहे.