नागपुरात ऑनलाइन देहविक्री रॅकेटवर पोलिसांचा छापा; ‘ऑपरेशन शक्ती’ अंतर्गत मोठी कारवाई

    07-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : शहर गुन्हे शाखेच्या सोशल सिक्युरिटी ब्रँचने (SSB) ‘ऑपरेशन शक्ती’ मोहिमेअंतर्गत ऑनलाइन माध्यमातून सुरू असलेल्या देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन महिलांची सुटका करण्यात आली असून, या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात ‘नागपूर इंडिका सर्व्हिसेस’ नावाच्या वेबसाइटद्वारे हा अवैध व्यवसाय चालवला जात असल्याचे उघड झाले आहे. महिलांना जास्त पैसे व आकर्षक कमाईचे आमिष दाखवून या व्यवसायात ओढले जात असल्याची बाब समोर आली आहे.

गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल राहुल डिलक्स परिसरातील OYO फ्लॅगशिप कृष्णा हॉटेलमध्ये ६ मे रोजी मध्यरात्री सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. छाप्यात दिल्ली आणि उत्तर प्रदेश येथील दोन महिलांची सुटका करण्यात आली.

या प्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा १९५६ आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, ‘राज’ नावाचा झारखंडमधील एक व्यक्ती या रॅकेटचा मुख्य सूत्रधार असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, वेबसाइट आणि मोबाइल क्रमांकांच्या आधारे त्याचा शोध सुरू आहे. पोलिसांनी कारवाईदरम्यान रोख रक्कम आणि इतर साहित्य असा एकूण ६ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सुटका करण्यात आलेल्या महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, पुढील चौकशीसाठी त्यांना गणेशपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई सोशल सिक्युरिटी ब्रँचचे पोलीस निरीक्षक राहुल शिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. मानव तस्करी आणि लैंगिक शोषणाविरोधात नागपूर पोलिसांनी सुरू केलेल्या ‘ऑपरेशन शक्ती’ मोहिमेअंतर्गत अशा कारवाया सातत्याने सुरू असल्याचे सांगण्यात आले.