इराण-अमेरिका संघर्षाचा थेट परिणाम एलपीजी दरांवर; घरगुती सिलेंडर मात्र स्थिर
Image Source:(Internet)
नागपूर : पश्चिम आशियातील इराण-अमेरिका संघर्षाचे पडसाद आता भारतातील एलपीजी बाजारातही उमटू लागले आहेत. 7 मे रोजी जाहीर करण्यात आलेल्या नव्या दरांनुसार घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती स्थिर ठेवण्यात आल्या असल्या, तरी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे आणि कॅफे चालकांच्या खर्चात मोठी भर पडणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत तब्बल 993 रुपयांची वाढ झाली असून आता हा सिलेंडर 3,071.50 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. 28 एप्रिलपासून सुरू झालेल्या युद्धजन्य परिस्थितीनंतरची ही तिसरी मोठी दरवाढ मानली जात आहे.
दरम्यान, 5 किलोच्या एफटीएल (बाजारभाव) सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. पूर्वी 549 रुपयांना मिळणारा हा सिलेंडर आता 810.50 रुपयांना विकला जात असून त्याचा दर घरगुती 14.2 किलो सिलेंडरच्या जवळपास पोहोचला आहे.
दुसरीकडे, सर्वसामान्यांना काहीसा दिलासा देत 14.2 किलो घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. 7 मार्च रोजी झालेल्या 60 रुपयांच्या वाढीनंतर दिल्लीत घरगुती सिलेंडरचा दर 913 रुपयांवर कायम आहे.
पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी सांगितले की, युद्धजन्य परिस्थितीमुळे आयातीवर काही प्रमाणात परिणाम झाला असला तरी घरगुती ग्राहकांसाठी 100 टक्के गॅस पुरवठा सुरू आहे. व्यावसायिक गॅस पुरवठाही सुमारे 70 टक्के सुरळीत सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून अतिरिक्त बुकिंग करू नये, असे आवाहनही सरकारकडून करण्यात आले आहे.
पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकारी तेल कंपन्यांनी मागील दोन दिवसांत जवळपास 15,900 टन व्यावसायिक एलपीजी, 876 टन ऑटो एलपीजी तसेच 1.20 लाखांहून अधिक 5 किलो सिलेंडर बाजारात उपलब्ध करून दिल्याची माहिती समोर आली आहे.