
Image Source:(Internet)
बगदाद : जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रचंड वाढले असताना इराक ने एक अनपेक्षित आणि मोठी ऑफर जाहीर करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड चा दर सुमारे ₹११,००० प्रति बॅरल असताना, इराकने अवघ्या ₹३,१०० मध्ये तेल विकण्याची तयारी दर्शवली आहे.
‘बसरा ग्रेड’ तेलासाठी विशेष अट-
इराककडून दिल्या जाणाऱ्या या सवलतीचा फायदा घ्यायचा असेल, तर खरेदीदारांना स्ट्रेट ऑफ होर्मुज परिसरात येणे आवश्यक आहे. इराकचे उच्च दर्जाचे बसरा ग्रेड क्रूड ऑईल त्यांच्या स्वतःच्या टँकर्सद्वारे पुरवले जाणार आहे. एका बॅरलमध्ये सुमारे १५९ लिटर तेल असते, त्यामुळे ही किंमत जागतिक बाजारपेठेसाठी अत्यंत आकर्षक ठरू शकते.
तणाव आणि आर्थिक दबावाची पार्श्वभूमी-
अमेरिकेच्या निर्बंधांमुळे आणि होर्मुज सामुद्रधुनीतील वाढत्या तणावामुळे इराकवर आर्थिक दबाव वाढला आहे. संयुक्त अरब अमिराती कडून ओपेक मधून बाहेर पडण्याच्या निर्णयामुळेही इराकच्या तेल निर्यातीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इराकची अर्थव्यवस्था जवळपास ९०% तेलावर अवलंबून असल्याने हा निर्णय महत्त्वाचा मानला जातो.
अमेरिकन कंपन्या आणि सुरक्षा अपेक्षा-
इराकच्या तेल क्षेत्रात हॅलिबर्टन आणि एसएलबी सारख्या मोठ्या कंपन्या कार्यरत आहेत. त्यामुळे या टँकर्सना समुद्रात सुरक्षा मिळेल, असा इराकला विश्वास आहे. विशेषतः अमेरिका या मार्गावर सुरक्षा पुरवेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जागतिक बाजारावर परिणाम?
जर इराकचा हा प्रयोग यशस्वी ठरला, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधनाचे दर कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, होर्मुज सामुद्रधुनी मधील वाढता लष्करी तणाव आणि जागतिक राजकीय परिस्थिती यावर या ऑफरचे भवितव्य मोठ्या प्रमाणात अवलंबून असेल.