केंद्र सरकारकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; FRP मध्ये वाढ, प्रति टन मिळणार अधिक दर

    06-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने 2026-27 हंगामासाठी ऊसाच्या FRP (किमान हमी दर) मध्ये वाढ मंजूर केली आहे.

या निर्णयानुसार 2026-27 हंगामासाठी ऊसाचा FRP 365 रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आला आहे. मागील हंगामाच्या तुलनेत हा दर वाढवण्यात आला असून शेतकऱ्यांना प्रतिटन अधिक उत्पन्न मिळणार आहे.

शेतकऱ्यांना थेट फायदा-
नवीन दरानुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन सुमारे 3650 रुपये मिळणार आहेत. साखर उताऱ्याच्या (रिकव्हरी) प्रमाणानुसार अतिरिक्त प्रोत्साहन किंवा कपात लागू होईल. मात्र 9.5% पेक्षा कमी रिकव्हरी असलेल्या कारखान्यांनाही किमान दराची हमी देण्यात आली आहे.या निर्णयामुळे देशातील सुमारे 5 कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आणि साखर उद्योगाशी संबंधित लाखो कामगारांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

उत्पादन खर्चापेक्षा अधिक दर-
सरकारी आकडेवारीनुसार ऊस उत्पादन खर्च (A2+FL) सुमारे 182 रुपये प्रति क्विंटल आहे. त्याच्या तुलनेत नवीन FRP सुमारे 100% पेक्षा जास्त आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.

साखर उद्योगावर परिणाम-
FRP वाढल्यामुळे साखर कारखान्यांवरील आर्थिक भार वाढला आहे. त्यामुळे साखरेच्या किमान दरात (MSP) आणि एथेनॉलच्या दरात वाढ करण्याची मागणी साखर उद्योगाकडून करण्यात येत आहे.

इतर कृषी निर्णय-
याच बैठकीत कापूस उत्पादन वाढीसाठी 5,659 कोटी रुपयांचा विशेष मिशन फंड मंजूर करण्यात आला आहे. तसेच हरभरा आणि सूर्यफूल खरेदीसाठी MSP मर्यादा वाढवून शेतकऱ्यांना सुमारे 4,886 कोटी रुपयांचे संरक्षण देण्यात आले आहे.

या निर्णयांमुळे कृषी क्षेत्राला मोठी चालना मिळणार असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.