
Image Source:(Internet)
सोलापूर : दीर्घ प्रतीक्षेनंतर पंढरपूर कॉरिडॉर आणि शहर विकास आराखड्याला राज्य मंत्रिमंडळाच्या शिखर समितीने मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, पालकमंत्री जयकुमार गोरे, वनमंत्री गणेश नाईक तसेच आमदार समाधान आवताडे आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत १ ऑगस्टपर्यंत भूसंपादनासह सर्व प्राथमिक प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
सुमारे ४००० कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात मंदिर परिसरातील कॉरिडॉर आणि शहराचा सर्वांगीण विकास यांचा समावेश आहे. पुढील ५० वर्षांत वाढणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन हा आराखडा तयार करण्यात आला आहे.
पंढरपूर हे विठ्ठल भक्तांसाठी अत्यंत श्रद्धास्थान आहे. आषाढी आणि कार्तिकी एकादशीसह वर्षभर लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. गेल्या आषाढी एकादशीला तब्बल २८ लाख भाविकांनी हजेरी लावल्याची नोंद झाली होती. या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितता आणि सुलभ दर्शनासाठी हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे.
दरम्यान, कॉरिडॉरमुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये निर्माण झालेल्या चिंतेवरही सरकारने भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यापाऱ्यांना आश्वस्त करत, या प्रकल्पामुळे त्यांचा व्यवसाय वाढेल, असे सांगितले होते.
या मंजुरीमुळे पंढरपूरच्या विकासाला मोठी चालना मिळणार असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.