
ImgSource(Internet)
मुंबई : अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेताच आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यभरातील भेसळखोर, गुटखा माफिया आणि नियमभंग करणाऱ्या आस्थापनांविरोधात आक्रमक मोहीम उघडली आहे. अवघ्या तीन दिवसांत राज्यभरात ५३ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या असून २५ गुन्हे दाखल करत ३३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे भेसळ माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
२५ मे रोजी पदभार स्वीकारल्यानंतर मुंढे यांनी राज्यातील सर्व विभागीय अधिकाऱ्यांना विशेष धाडी मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागात अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कारवाया सुरू केल्या.
या धडक मोहिमेत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, भेसळयुक्त दूध, निकृष्ट खाद्यपदार्थ, बनावट लेबलिंग आणि अस्वच्छ उत्पादन केंद्रांवर छापे टाकण्यात आले. ५३ आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ३४ ठिकाणी प्रतिबंधित पदार्थांची विक्री सुरू असल्याचे उघड झाले. प्रशासनाने ५ वाहने जप्त केली असून २७ आस्थापनांवर सील ठोकण्यात आले आहे. या कारवाईत सुमारे २० लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मुंबई विभागात सर्वाधिक कारवाई झाली असून १९ आस्थापनांवर छापे टाकत १९ जणांना अटक करण्यात आली आहे. तर राज्यभरातील विविध ठिकाणी पॅकबंद पाणी, दूध, नूडल्स, खाद्यतेल, मसाले, तूप, खवा, पनीर, आईस्क्रीम आणि फरसाण यांसारख्या पदार्थांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. जवळपास २८ लाख ७८ हजार रुपयांचा संशयित साठा जप्त करण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यात धरणगाव तालुक्यात गायीच्या दुधात खाद्यतेल मिसळून कृत्रिम दूध तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. तर इंदापूरमध्ये रसायनांच्या सहाय्याने कृत्रिमरीत्या पिकवलेले आंबे जप्त करून नष्ट करण्यात आले.
धुळे जिल्ह्यात एका आटा मिलमध्ये अत्यंत अस्वच्छ वातावरणात मटर बेसन तयार होत असल्याचे उघड झाले. या ठिकाणाहून तब्बल १४ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. धारावीमध्ये लेबलिंग नियमांचे उल्लंघन करून नूडल्स उत्पादन सुरू असल्याचे समोर आले, तर नाशिकमध्ये बनावट लेबलिंग आणि परवान्याविना खाद्यपदार्थ उत्पादन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
पालघरमध्ये अस्वच्छ वातावरणात सुरू असलेल्या आईस्क्रीम उत्पादन केंद्रावरही प्रशासनाने धाड टाकत लाखोंचा साठा जप्त केला.
“जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही. भेसळ, गुटखा विक्री आणि असुरक्षित अन्न उत्पादनाविरोधातील कारवाई आणखी कठोर करण्यात येईल,” असा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.
तसेच नागरिकांनी भेसळीबाबत माहिती मिळाल्यास अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. तक्रारदारांची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.