पुण्यात विषारी दारूने घेतले १४ बळी; सरकार सतर्क, मुख्यमंत्र्यांचे कठोर कारवाईचे आदेश

    29-May-2026
Total Views |
ImgSource(Internet)

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूंनी राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने पोलिस अधिकाऱ्यांना कठोर पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तांशी थेट संवाद साधत या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे निर्देश दिले. “दोषींना कोणतीही माफी नाही. प्रत्येक आरोपीवर कठोर कारवाई झाली पाहिजे,” असा स्पष्ट संदेश त्यांनी प्रशासनाला दिला आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस आणि अबकारी विभाग संयुक्तपणे करत असून शहरातील अनेक भागांत धाडसत्र सुरू करण्यात आले आहे. विषारी दारूचा साठा आणि पुरवठा कुठून होत होता, याचा शोध घेण्यासाठी रात्रभर कारवाया करण्यात आल्या.

या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून कर्नल विरखा सिंग याला अटक करण्यात आली असून त्याच्यासह आणखी आठ जण पोलिसांच्या ताब्यात आहेत. सर्व आरोपींवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तपास पुढे जात असताना आणखी काही जणांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी वैद्यकीय आणि फॉरेन्सिक तपास सुरू करण्यात आला आहे. राज्यभरातील अवैध दारू विक्रीविरोधात मोठी मोहीम हाती घेण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत.