
ImgSource(Internet)
नागपूर : अमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन थंडर’ मोहिमेंतर्गत यशोधरा नगर पोलिसांनी मोठी कारवाई करत तेलंगणातील तीन युवकांना गांजासह अटक केली आहे. संघर्ष नगर परिसरातील टिपू सुलतान चौकाजवळ २८ मेच्या मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली.
माहितीनुसार, गुन्हे शाखेचे पथक रात्री गस्त घालत असताना प्लॉट क्रमांक १०४ जवळील नाल्याजवळ तीन युवक संशयास्पद हालचाली करताना दिसले. त्यांच्या हातात निळ्या आणि जांभळ्या रंगाची बॅग होती. पोलिसांना पाहताच तिघांनी घटनास्थळावरून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून त्यांना पकडले.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये सेनिग्राम राकेश सेनिग्राम कंकय्या, रितेश कालेरू राजू आणि बिजलीपूर चरण बिजलीपूर रमेश यांचा समावेश आहे. तिघेही तेलंगणातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीत आरोपींकडून १ किलो १३० ग्रॅम ओला गांजा जप्त करण्यात आला. हा गांजा छोट्या प्लास्टिकच्या पुड्यांमध्ये भरलेला होता. त्यातून तीव्र वास येत असून त्यात हिरवी पाने आणि बियांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
प्राथमिक चौकशीत आरोपींनी हा गांजा यशोधरा नगर परिसरातील शेख शाहरुख नावाच्या फरार व्यक्तीकडून घेतल्याची कबुली दिल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपींकडून गांजा, मोबाईल फोन आणि बॅगा असा एकूण ३५ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी यशोधरा नगर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. फरार आरोपी शेख शाहरुखचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.