नागपुरात मानकापूर पोलिसांची कामगिरी; ७.६० लाखांचे ५७ मोबाईल शोधून मालकांच्या हाती

    29-May-2026
Total Views |
ImgSource(Internet)

नागपूर : मानकापूर पोलिसांनी तांत्रिक तपास आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर मोठी कामगिरी करत चोरीला गेलेले आणि हरवलेले तब्बल ५७ मोबाईल शोधून काढले आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या विशेष मोहिमेत पोलिसांना हे यश मिळाले असून जप्त करण्यात आलेल्या मोबाईलची एकूण किंमत सुमारे ७ लाख ६० हजार रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.

आधुनिक ट्रॅकिंग सिस्टीमच्या मदतीने रेडमी, सॅमसंग, व्हिवो, ओप्पो आणि आयफोनसह विविध कंपन्यांचे मोबाईल शोधण्यात आले. पोलिस उपायुक्त नित्यानंद झा यांच्या हस्ते संबंधित नागरिकांना त्यांचे मोबाईल परत करण्यात आले. हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी मानकापूर पोलिसांचे आभार मानत समाधान व्यक्त केले.

ही मोहीम यशस्वी करण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक हरेश काळसेकर यांच्यासह मानकापूर पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच मोबाईल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे आवाहनही पोलिसांनी नागरिकांना केले आहे.