
Image Source:(Internet)
मुंबई : विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असताना महायुतीतील जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नसल्याचे स्पष्ट संकेत मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील 17 जागांवरील महायुतीतील समन्वयाबाबतचा सस्पेन्स आणखी वाढला आहे.
जळगावसह राज्यातील कोणत्याही विधान परिषद जागेचा अंतिम फॉर्म्युला ठरलेला नाही, असे सांगताना पाटील म्हणाले की, जागावाटपाबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या पातळीवर होणार आहे.
जलजीवन मिशनच्या निधीसंदर्भात दिल्ली दौऱ्यावर असल्याने प्रमुख बैठकींना उपस्थित राहू शकलो नाही, अशी माहितीही त्यांनी दिली. त्यामुळे महायुतीत काही जागांवर अद्यापही एकमत झाले नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
जागावाटपात विलंब झाल्यास काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता नाकारता येणार नाही, असे संकेतही गुलाबराव पाटील यांनी दिले. “आमचे पहिले प्राधान्य महायुतीच असेल, मात्र योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल,” असे सांगत त्यांनी शिवसेनेच्या दाव्याबाबत सूचक भूमिका मांडली.
दरम्यान, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांनाही त्यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळले. “मी गेली ४५ वर्षे शिवसेनेत आहे. त्यामुळे भाजप प्रवेशाच्या चर्चा निराधार आहेत,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
आमदार संतोष बांगर यांच्या संभाव्य मंत्रिमंडळ प्रवेशाबाबत बोलताना त्यांनी, खासदार श्रीकांत शिंदे हे पक्षाचे नेते असून संकेत देण्याचा अधिकार त्यांना असल्याचे म्हटले.
याचवेळी दुधात पाम तेल मिसळून भेसळ केल्याच्या प्रकारावरही त्यांनी संताप व्यक्त केला. “दूध लहान मुलांपासून सर्वजण पितात. त्यात भेसळ करणे हे मोठे पाप आहे,” असे म्हणत संबंधितांवर कठोर कारवाईचे आदेश पोलीस प्रशासनाला दिल्याचे त्यांनी सांगितले.
तर एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्येला अटकपूर्व जामीन मंजूर झालेल्या प्रकरणावर बोलताना, हे जुने प्रकरण असून न्यायालयाने दिलेला निर्णय मान्य असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.