
ImgSource(Internet)
नवी दिल्ली : सोशल मीडियावर अचानक चर्चेत आलेल्या कॉकरोच जनता पक्षाच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने पक्षाची बंद करण्यात आलेली सोशल मीडिया खाती तातडीने पुन्हा सुरू करण्याची मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
अभिजीत दीपके यांनी सोशल मीडिया खाते पूर्ववत करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने तात्काळ दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिला.
काही दिवसांपूर्वी कॉकरोच जनता पक्षाचे एक्ससह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील खाते बंद करण्यात आले होते. त्याआधी या पक्षाची सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली होती. अल्पावधीतच लाखो फॉलोअर्स वाढल्याने अनेकांचे लक्ष या पक्षाकडे वेधले गेले होते.
विशेष म्हणजे, या पक्षाच्या सोशल मीडिया खात्यांवर परदेशातून, विशेषतः पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याची चर्चा होती. त्यानंतरच संबंधित खाती बंद करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, अवघ्या काही दिवसांत इन्स्टाग्रामवर एक कोटी फॉलोअर्स मिळवल्याचा दावा करत या पक्षाने सोशल मीडियावर मोठी हवा निर्माण केली होती. अनेक प्रस्थापित पक्षांपेक्षा अधिक वेगाने लोकप्रियता मिळाल्याने हा विषय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला होता.
मात्र, आता न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्याने कॉकरोच जनता पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुढे अभिजीत दीपके कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.