नागपूरच्या वानाडोंगरीतील सूतगिरणी भागात भीषण आग; दुकान भस्मसात, १० लाखांपर्यंत नुकसान

    28-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : वानाडोंगरी परिसरातील काळेवाडी येथील सूतगिरणी भागात गुरुवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीमुळे एक व्यावसायिक आस्थापना पूर्णपणे जळून खाक झाली. आग प्रचंड स्वरूपाची असल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशमन दलाने जवळपास चार तास अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले.

ही घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास नगरसेवक बालू मोरे यांनी अग्निशमन विभागाला घटनेची माहिती दिली. त्यानंतर वानाडोंगरी नगर परिषदेसह विविध अग्निशमन दलाची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली.

दुकानात मोठ्या प्रमाणात ज्वलनशील वस्तू साठवून ठेवण्यात आल्याने आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केले. आगीच्या ज्वाळा आणि काळ्या धुराचे ढग दूरवरून दिसत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती.

आग आटोक्यात आणण्यासाठी वानाडोंगरी नगर परिषद, एमआयडीसी अग्निशमन केंद्र, निलडोह नगर पंचायत, डिगडोह नगर परिषद आणि हिंगणा नगर पंचायत यांच्या पाच अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल करण्यात आल्या होत्या. फायर ऑफिसर संकेत प्रमोद माटे यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव आणि अग्निशमन मोहीम राबवण्यात आली.

प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत सुमारे ८ ते १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. दुकानातील बहुतांश साहित्य जळून नष्ट झाले असून प्रशासनाकडून पंचनामा करण्यात आला आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात असली तरी नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहेत.