
Image Source:(Internet)
नागपूर : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला उद्या चार महिने पूर्ण होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार Rohit Pawar यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. अजितदादांच्या मृत्यूप्रकरणी सरकारने दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण झाली नसल्याचा आरोप करत रोहित पवारांनी सीआयडीच्या तपासावरही तीव्र नाराजी व्यक्त केली.
२८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे सभेसाठी जात असताना अजित पवार यांच्या विमानाचा लँडिंगपूर्वीच स्फोट होऊन भीषण अपघात झाला होता. या घटनेनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. मात्र चार महिने उलटल्यानंतरही तपासात ठोस प्रगती न झाल्याने रोहित पवार आक्रमक झाले आहेत.
सोशल मीडियावर पोस्ट करत रोहित पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांना अधिवेशनातील आश्वासनांची आठवण करून दिली. “गुन्हेगारांना पाताळातून शोधून काढू, सीबीआय चौकशीसाठी Amit Shah यांच्याकडे पाठपुरावा करू, तसेच कर्नाटकात दाखल झालेली झिरो FIR महाराष्ट्रात वर्ग करू,” असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अडीच महिने उलटूनही कोणती कारवाई झाली, याचे उत्तर सरकारने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
“गेल्या अडीच महिन्यांत अमित शाहांसोबत अनेक बैठका झाल्या असतील. त्यामध्ये सीबीआय चौकशीचा मुद्दा मांडला गेला का? आजच्या बैठकीत तरी हा विषय गंभीरतेने घ्यावा,” असेही रोहित पवार म्हणाले. राष्ट्रवादीचे मंत्रीही या प्रकरणात पुरेसा पाठपुरावा करत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
सीआयडीच्या तपासावर टीका करताना रोहित पवार म्हणाले, “CID कार्यालयात गेलो असता तपास अधिकारी उपस्थित नव्हते. मेलद्वारे आणि पत्राद्वारे नवीन पुरावे दिले, तरी कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.” “अजितदादांच्या अपघातप्रकरणी CID चा तपास पाहता ही यंत्रणा बिनकामाचे ओझे ठरत आहे,” अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, उद्या सकाळी १०.३० वाजता CID कार्यालयात भेट देणार असल्याचे सांगत, “सनदशीर भाषेने काम होत नसेल तर वेगळ्या भाषेत सांगावे लागेल,” असा इशाराही रोहित पवारांनी दिला आहे. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे अजित पवार अपघात प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.