वाढत्या उकाड्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा इशारा; नागरिकांना दिल्या काळजी घेण्याच्या सूचना

    27-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नवी दिल्ली : देशातील अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा झपाट्याने वाढत असून नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी जनतेला आरोग्याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कडक उन्हाळ्यात स्वतःची, ज्येष्ठ नागरिकांची तसेच मुक्या प्राणी-पक्ष्यांची काळजी घेण्याचा संदेश त्यांनी दिला.

उन्हामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होण्याचा धोका वाढत असल्याने दिवसभर भरपूर पाणी पिणे आवश्यक असल्याचे मोदी यांनी सांगितले. शक्यतो दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे आणि बाहेर जाताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी, असा सल्लाही त्यांनी नागरिकांना दिला.

समाजात माणुसकीची भावना जपण्याचे आवाहन करत तहानलेल्या लोकांसाठी सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले. तसेच घरातील वृद्ध व्यक्तींना वेळोवेळी पाणी पिण्याची आठवण करून द्यावी आणि त्यांना उष्णतेपासून सुरक्षित ठेवावे, असेही त्यांनी म्हटले.

उष्णतेचा त्रास फक्त माणसांनाच नव्हे तर प्राणी आणि पक्ष्यांनाही होत असल्याचे नमूद करत नागरिकांनी घराबाहेर, बाल्कनी किंवा गच्चीत पाण्याची भांडी ठेवावीत, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.